नाशिक : दिवसेंदिवस सायबर गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवून अनेक नागरिकांना गंडा (Crime) घालत आहे. देशासमोर सायबर गुन्हेगारीचे (Cyber Crime) नवे चॅलेंज उभे राहत असतांना बँकेच्या भूमिकेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे येथील रहिवाशी असलेलेल सेवानिवृत्त अधिकारी विजकुमार ठुबे यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. ठुबे हे बांधकाम विभागात (PWD) अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते नाशिकला (Nashik) नातेवाईकांच्या घरी आलेले असतांना ही आर्थिक फसवणूक झाली आहे. ठुबे यांनी सायबर पोलिसांत धाव घेत थेट एका नामांकित बँकेच्या विरोधात तक्रार देत जवळपास 2 लाख रुपयांची भरपाई करून द्यावी अशी मागणी केली आहे.
ठुबे यांना त्यांच्या बँकेच्या खात्यास लिंक असलेल्या मोबईल क्रमांकावर कॉल आला, आणि आपल्या खात्याला पॅनकार्ड लिंक न केल्यास खाते ब्लॉक होईल अशी माहिती दिली.
ठुबे यांनी त्यांना स्वतःशी संबंधित काही प्रश्न केले असतांना त्यांनी अचूक उत्तरे ही दिली, त्यात बँकेचा खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, आणि मोबाइल क्रमांक यांचा समावेश होता.
ठुबे यांना त्यांच्याबाबत दिलेली माहिती योग्य वाटल्याने त्यांनी पुढे बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना एक लिंक पाठवण्यात आली.
स्वतःविषयी आणि बँकेविषयी प्राप्त माहिती भरून ओटीपी भरण्यास भाग पाडले आणि तब्बल एक लाख 99 हजार 342 रुपयांना गंडा घातला आहे.
ठुबे यांनी तात्काळ नाशिक येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत आपली फसवणूक झाल्याचे सांगत तक्रार दिली आहे त्यावरून सायबर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सायबर पोलीस ठाण्याचे वारिष्ट पोलीस निरीक्षक सुरेश बिजली यांनी याबाबत तपास सुरू केला असून चार दिवसांपूर्वी संबंधित बँकेला तक्रारदाराच्याबद्दल तपशील मागविला आहे.
मात्र, असे अनेक गुन्हे घडत असल्याने बँकेतून कुणी डेटा चोरी करतंय का ? अधिकारीच अशा प्रकरणात सहभागी आहे असा संशय पोलीसांना आहे.
वेळोवेळी सायबरबाबत जनजागृती करूनही नागरिकांची फसवणूक होत असल्याने आणि बँकेकडून तपासात सहकार्य मिळत नसल्याने सायबर पोलीस हतबल झाले आहे.
तक्रारदारांना दिलासा देण्यासाठी पोलीसांनाच वेगवेगळ्या पद्धतीने तपास करावा लागत असल्याने सायबर टीमची डोकेदुखी वाढली आहे.
शहरातील विविध ठिकाणी जनजागृती करण्यासाठी एकूण पाच पथके सायबर पोलीसांनी सज्ज केले आहे.
योग्य माहिती जाणून घ्यायची असेल तर सायबर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्तालय सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश बिजली यांनी केले आहे.