चंदीगड : कुणाचं मरण कधी आणि कुठे येईल याची काही शाश्वती नाही. मृत्यूला केवळ निमित्त लागतं. तुम्ही घराबाहेर पडता. पण परत याल याची काही शाश्वती नसते. कारण काळ कधी कुणावर घाला घालेल याची काही शाश्वती नसते. एका गरीब शेतकऱ्याच्या बाबतही असंच घडलंय. दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर तो रात्री शेतात झोपण्यासाठी गेला. परत आलाच नाही. आली ती त्याची बॉडी. या धक्कादायक घटनेने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे रडून रडून हाल होत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हरियाणाच्या पलवलच्या घरोट गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याचा झोपेतच खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच हथीनचे डीएसपी सुरेश भडाना यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. घरोट येथील रहिवासी पुष्पेंद्र यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली होती. पुष्पेंद्र याच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील प्रल्हाद नेहमी शेतात झोपायला जातात. त्यानुसार सोमवारी रात्री 11 वाजता ते घरातून शेतात झोपायला गेले. मंगळवारी सकाळी जेव्हा मी वडिलांसाठी चहा घेऊन शेतात गेलो तेव्हा त्याचे वडील खाटेवर मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं. कुणी तरी त्यांचा गळा कापल्याने खाटेवर रक्ताचे सडे पडले होते.
प्रल्हाद यांच्या शरीरावर प्रचंड जखमा होत्या. पोलिसांना या घटनेची माहिती दिली गेली, त्यानुसार पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पलवल येथील नागरिक रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या हत्येमुळे प्रल्हाद याचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी मिडकौला महामार्गावर आंदोलन केलं. ठिय्या आंदोलन करत त्यांनी रस्ता रोको केला. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.
पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, आरोपींचा अजून शोध लागलेला नाही. तसेच प्रल्हादची हत्या का करण्यात आली? त्यामागे काय कारण आहे? याचाही शोध लागलेला नाही. शिवाय प्रल्हादची गावातील कुणाशीच दुश्मनी नसल्याची माहिती समोर आल्याने त्याच्या हत्येचा उलगडा करणं पोलिसांसमोर आव्हान बनलं आहे.