चंद्रपूर / 19 ऑगस्ट 2023 : चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची करोडोची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सफारी बुकिंग करणाऱ्या एजन्सीच्या 3 वर्षाच्या लेखा अहवालानंतर ताडोबा व्यवस्थापनाने तक्रार नोंदविली. बुकिंग एजन्सीच्या 2 संचालक भावांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. ठाकूर बंधूंनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सुमारे 12 कोटींची फसवणूक केली आहे. या कारवाईमुळे चंद्रपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये येण्यासाठी ऑनलाईन तिकिट बुकिंग एजन्सी म्हणून चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हिटी सोल्युशनकडे जबाबदारी होती. करारानुसार, गेल्या 3 वर्षात एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रकमेपैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा या एजन्सीने केला. बाकी रक्कम देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही उर्वरित रक्कम मिळालेली नाही.
या एजन्सीने सुमारे 12 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांची व्यवस्थापनाची फसवणूक केली आहे. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला फसविल्याप्रकरणी बुकिंग एजन्सी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान आणि एजन्सी यांच्यात झालेल्या कराराच्या अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अखेर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.