Gondia News : शिकारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा शॉक लागून मृत्यू, लोकांना कळू नये म्हणून मृतदेह टाकून सहकारी पळाले, काय आहे प्रकरण?
चौघे जण रानडुकराची शिकार करायला गेले होते. डुकराला मारण्यासाठी त्यांनी वीजेची तार शेतात टाकली होती. मात्र डुकर जाळ्यात फसण्याआधी शिकारीच अडकला.
गोंदिया / 5 ऑगस्ट 2023 : डुकराच्या शिकारीला जाणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे. डुकरासाठी लावलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला. सहकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर कुणाला याबाबत कळू नये आणि आपले नाव येऊ नये म्हणून इतर तिघांनी मृतदेह लपवून तेथून पळ काढला. आमगाव तालुक्यातील मानेगाव येथे ही घटना घडली. मात्र घरच्यांनी मयताचा शोध सुरु केला आणि अखेर हा प्रकार उघडकीस आला. अशोक कोहळे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर अन्य दोन आरोपी फरार झाले आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
डुकरासाठी लावलेल्या तारेचा शॉक लागला
अशोक मडावी, दुर्गेश बिहारी, राधेश्याम देवराम ठाकरे आणि अशोक कोहळे हे चौघेजण डुकराची शिकार करण्यासाठी गेले होते. यासाठी गावातील पांडे बाईंच्या शेतात खुंट्या गाडून त्यावर सेन्ट्रिंगची तार लावली आणि इलेक्ट्रिक पोलच्या तारेला वायरने जोडली. पण अनधिकृतरित्या लावलेल्या या इलेक्ट्रिक करंटचा त्यांच्यापैकीच एकाला शॉक लागला. यात अशोक याचा जागीच मृत्यू झाला. अशोकचा मृत्यू झाल्याने बाकीचे तिघे घाबरले.
पकडले जाऊ नये म्हणून मृतदेह लपवून सहकारी पळाले
अशोकच्या मृत्यूची बाब कळली तर आपली चोरीही पकडली जाईल. चोरुन वीज घेणे, जंगल प्राण्याची शिकार करणे या गोष्टी उजेडात येतील आणि आपल्याला शिक्षा होईल अशी भीती निर्माण झाली. यामुळे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिघांनी अनधिककृत जोडलेली वीजेची तार फेकून दिली. मग महादेव पहाडी गडमाता मंदिराच्या मागे झाडीत मृतदेह फेकून पळून गेले.
‘असा’ झाला खुलासा
दुसरीकडे अशोक बेपत्ता झाल्याने त्याच्या मामाने पोलिसात तो बेपत्ता झाल्याची तक्रार आमगाव पोलिसात दाखल केली. पोलिसांनी फिर्याद नोंदवत अशोकचा शोध सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना शिकारीबाबत कळले आणि पोलिसांनी सखोल तपास करत एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी झाडीतून अशोकचा मृतदेह ताब्यात घेत एका आरोपीला अटक केली. अन्य दोघे जण फरार झाले असून, पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.