मुलगा विवाहित बहिणीला भेटायला गेला होता, सकाळी परतला तर घरातील दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली !
मुलगा विवाहित बहिणीकडे गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतला. घरी आला तर दरवाजा कुलूप होतं. त्याने आईला आवाज देत आसपास कुठे आहे का पाहिलं. मग कुलूप तोडून आत गेला तर धक्काच बसला.
भंडारा : महिलांच्या हत्येचं सत्र थांबताना दिसत नाही. भंडाऱ्यात आणखी एका महिलेच्या हत्येची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा दिवसात ही दुसरी घटना आहे. कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना भंडाऱ्याच्या एकलारी गावात घडली आहे. येनूबाई कंठीराम बालपांडे असे मयत महिलेचे नाव आहे. पत्नीच्या हत्या केल्यानंतर पती घरात मृतदेह टाकून फरार झाला आहे. याप्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत. महिलेला विवाहित मुलगी आणि एक मुलगा आहे. घटनेवेळी महिला आणि तिचा पती दोघेच घरी होते. मुलगा घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
मुलगा बहिणीला भेटायला गेला होता
येनूबाई यांचा मुलगा विवाहित बहिणीच्या घरी गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परतला तर दरवाजाला कुलूप होतं. आई कुठे गेली असेल हा विचार करतच त्याने दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. आत जाताच समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला होता. तर बाप फरार होता.
वरठी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या केली असावी, असा संशय वरठी पोलिसांनी व्यक्त केला आहे.गेल्या सहा दिवसात जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. दोन्ही हत्याकांडाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
चारित्र्याच्या संशयातून सासऱ्यानं केली सुनेची हत्या
चारित्र्यावर संशय घेऊन सासऱ्यानं सूनेची कुऱ्हाडीनं अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना सहा दिवसापूर्वी घडली. भंडारा जिल्ह्यातील रोहना गावात ही घटना घडली. प्रणाली सतीश ईश्वरकर असं मृत सुनेचं नावं आहे, तर बळवंत ईश्वरकर असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. हत्या झाली त्यावेळी घरात मोठं व्यक्ती कुणीच नव्हतं. प्रणालीचा पती घराबाहेर गेला होता. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.