भिशीच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा चुना, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
भिशीच्या नावाखाली सोनाराने नागरिकांची लूट केले. मग पोलीस कारवाईच्या भीतीने गावी पळाला. यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच.
डोंबिवली : भिशीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करुन पसार झालेल्या सोनाराला रामनगर पोलिसांनी राजस्थानमधून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी 35 लाखापेक्षा अधिक रक्कमेचे दागिने आणि पैसे घेऊन फरार झाला होता. सोहन सिंग दसाना असे या भामट्याचे नाव आहे. हा भामटा पोलिसांना गुंगारा देण्यासाठी डोंबिवलीतून पळ काढत सहा महिन्यांपासून आपल्या मूळ गावी होता. घरातील एका रुममध्ये बाहेरुन टाळे ठोकून आपल्या पत्नी आणि मुलीसह राहत होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी घरात दाखल होत घराचे कुलूप तोडून त्याला बेड्या ठोकत डोंबिवलीत आणले. सध्या या आरोपीकडून पोलिसांनी 3 लाखाचा मुद्देमाल जप्त करत अधिक तपास सुरू केला आहे.
भिशीच्या नावाखाली फसवणूक
डोंबिवली ठाकुर्ली परिसरात महालक्ष्मी नावाचं सोनाराचं दुकान होतं. या दुकानाचा मालक सोहन सिंग दसाना याने सहा महिन्यांपूर्वी भिशी लावण्याच्या नावाखाली नागरिकांकडून 35 लाखापेक्षा अधिक रक्कमेचे दागिने आणि पैसे घेतले. यानंतर सर्व मुद्देमाल घेऊन तो पसार झाला. याबाबत रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला होता. मात्र आरोपी सोनार सोहन सिंग दसाना याने गुन्हा दाखल होण्याची माहिती मिळताच डोंबिवलीतून पळ काढत थेट त्याचे मूळ गाव राजस्थान गाठले.
सहा महिने पोलिसांना गुंगारा
पोलीस गावीही येतील हे लक्षात ठेवत त्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी गावात असलेल्या घरातील एका रुममध्ये बाहेरुन टाळे ठोकून आपल्या पत्नी आणि मुलीसह तो राहत होता. याची खबर त्यांच्या गावात राहणाऱ्या लोकांनाही नव्हती. सहा महिने पोलीस आरोपीचा माग काढत होते. यानंतर कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर, पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी योगेश सानप यांनी सुरू केला.
आरोपीला शोधण्यासाठी पोलीस अधिकारी सानप, पोलीस कर्मचारी विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, निसार पिंजारी यांचं पथक राजस्थान येथील थुरावड बकगडा भागल असलेल्या त्याच्या गावात पोहचले. त्यांच्या घरच्यांकडे विचारपूस केली, मात्र त्यांच्या घरच्यांनी ते सहा महिन्यांपासून आमच्या संपर्कात नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना पक्का संशय होता की, तो त्याच घरात आहे.
मग पोलिसांनी घरात शिरून पाहिले असता एका रूमला बाहेरून कुलूप लावलेलं होतं. पोलिसांनी ते कुलुपू तोडले आणि त्या खोलीतून आरोपीला ताब्यात घेऊन त्याला रामनगर पोलीस ठाण्यात आणले. या आरोपीकडून तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.