नवी दिल्ली | 28 ऑगस्ट 2023 : देशातील सर्वात महत्वपूर्ण कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची एजीएम अर्थात ॲन्युअल जनरल मीटिंग (RIL AGM) आज होणार आहे. ही कंपनीची 46 वी एजीएम असून दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील ही सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जाणार आहे. रिलायन्सच्या एजीएमचा गुंतवणूकदारांसह बाजारही आतुरतेने वाट पाहत असतो. याचे मुख्य कारण म्हणजे या सभेत कंपनीतर्फे काही महत्वाच्या घोषणा केल्या जातात, जी बाजाराची पुढील दिशा ठरवते.
रिलायन्सच्या एजीएम अर्थात वार्षिक सभेची सुरूवात कंपनीचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी केली होती. त्यांच्या काळात रिलायन्सची एजीएम एखाद्या रॉक कॉन्सर्टप्रमाणे स्टेडिअममध्ये व्हायची. मात्र आता ही सभा शेअरहोल्डर्ससाठीच नव्हे तर सामान्य लोकांसाठी ऑनलाइन आणि टीव्हीवरही प्रसारित केली जाते.
शेअर बाजारामध्ये जिओ फायनॅन्शिअल सर्व्हिसेसचे लिस्टींग झाल्यानंतर रिलायन्सची ही पहिली सभा आहे. 21 ऑगस्ट रोजी कंपनीचे लिस्टिंग झाले होते. या एजीएममध्ये कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जिओ फायनॅन्शिअल सर्व्हिसेसच्या बिझनेस प्लान बद्दल मोठी घोषणा करू शकतात, अशी चर्चा आहे. त्याशिवाय ते टेलिकॉम आणि रिटेल बिझनेसच्या आयपीओबद्दलही अपडेट देऊ शकतात. तसेच कंपनीच्या उत्तराधिकार योजनेवरही चर्चा होऊ शकते. रिलायन्स कंपनीच्या शेअरहोल्डर्सची संख्या 36 लाखांहून अधिक आहे.
कुठे पाहू शकता ?
रिलायन्सची ही 46 वी एजीएम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. धीरूभाई अंबानींच्या काळात रिलायन्सची एजीएम स्टेडियममध्ये एखाद्या रॉक कॉन्सर्टप्रमाणे व्हायची. मुकेश अंबानींच्या काळातही रिलायन्सच्या वार्षिक सभेची चमक कायम आहे. पण आता तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले आहेत. Jio 5G आणि Jio Fiber सारखी उत्पादने अशाच सभेत लाँच करण्यात आली होती. आता एजीएम ही केवळ शेअरहोल्डर्ससाठीच नसते तर सामान्य जनतेला पाहता यावी यासाठी त्याचे ऑनलाइन आणि टीव्हीवरही प्रसारण केले जाते.