मुंबई : ऑटो कंपन्या ग्राहकांची गरज ओळखून आपल्या कार लाँच करतात. त्या गाड्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहेत? हे तपासण्यासाठी ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट केली जाते. यामुळे ग्राहकांना आपण घेत असलेली कार किती सुरक्षित आहे याचा अंदाज येतो. आता भारतीय कंपन्यांना कार टेस्टसाठी ग्लोबल एनसीपीए प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज नाही. कारण आता गाड्यांची अपघात चाचणी भारतातच होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची नुकतीच घोषणा केली होती. आता 1 ऑक्टोबर 2023 पासून भारत एनसीएपी क्रॅश टेस्ट अभियान सुरु होणार आहे. पण ही क्रॅश चाचणी भारतात कशी होईल? याबाबत अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घ्या क्रॅश टेस्टिंग कशी होते, किती कॅमेरे लावलेले असतात? किती वेळा टेस्टिंग होते?
अनेकदा ग्राहकांना गाडीच्या डिझाईनची भूरळ पडते आणि त्यावरून निवड केली जाते. पण वरून जबरदस्त दिसणारी गाडी किती मजबूत आहे? याबाबत कल्पना नसते. कार क्रॅश टेस्टमध्ये गाडीच्या एक्सटीरियर आणि इंटीरियर या दोघांची तपासणी केली जाते. यावरून कारला रेटिंग दिली जाते. एका विशिष्ट वेगाने गाडीचा अपघात झाल्यास काय स्थिती असेल? प्रौढ, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी गाडी सुरक्षेच्या दृष्टीने किती योग्य यावरून ठरवलं जातं.
ग्लोबल एनसीएपी चाचणीत कारचा स्पीड 64 किमी प्रतितास इतका असतो. या वेगातच गाडी समोर असलेल्या बॅरियवर आदळली जाते. या चाचणीतून प्रौढ आणि मुलांच्या दृष्टीने वेगवेगळी रेटिंग दिली जाते. भारतात होऊ घातलेल्या भारत एनसीएपी चाचणीती फ्रंट ऑफसेट टेस्टिंगसाठी स्पीड 64 किमी प्रतितास, साईड इम्पॅक्ट टेस्टिंगसाठी 50 किमी वेग आणि पोल साईड इम्पॅकसाठी 29 किमी प्रतितास वेग असेल. सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांना साईड इम्पॅक्ट आणि फ्रंट ऑफसेट दोन्ही क्रॅश टेस्ट करणं अनिवार्य असेल.
कार क्रॅश टेस्टिंगमध्ये माणसाचं डमी मॉडेल बसवलं जातं. तर या चाचणीदरम्यान गाडीत 8 ते 10 कॅमेरे बसवलेले असतात. यामुळे वेगवेगळ्या अँगलमधून अंदाज घेतला जातो. गाडी आदळल्यानंतर काय घडतं याची नोंद केली जाते. विशेष म्हणजे भारतात सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्यांची टेस्ट होणार आहे. ही क्रॅश टेस्ट फक्त एकदाच केली जाईल, कारण ही प्रक्रिया खूपच खर्चिक आहे.
ग्लोबल एनसीएपी चाचणीसाठी एक वेगळा प्रोटोकॉल आहे. तर भारत एनसीएपीसाठी वेगळा प्रोटोकॉल असणार आहे. ग्लोबल एनसीएपीत एखाद्या गाडीला पाच स्टार मिळण्यासाठी प्रौढांसाठी 34 गुण, फ्रंट क्रॅश टेस्टसाठी 16 गुण, साईड इम्पॅक्टसाठी 16 गुण आणि सीटबेल्ट रिमाइंडरसाठी 2 गुण मिळतात. दुसरीकडे, भारत एनसीएपीसाठी प्रौढांसाठी कमीत कमी 27, तर लहान मुलांसाठी कमीत कमी 41 गुण मिळवणं गरजेचं आहे. क्रॅश टेस्टिंगमध्ये फ्रंट ऑफसेट, साईड इम्पॅक्ट आणि पोल साईड इम्पॅक्ट तपासला जाणार आहे.